Sunday, April 22, 2012

गझल



मी, भाडखाऊ वेदनेला लेवून अंगावर आता बसतो उर दाबीत ,
गळा तरी कापायचास माझा , साला आता फिरतो हृदय शोधीत ....

नात्याचे काय असते आपले? ना मांस ना काष्ठ ना रज्जू 
मग वचनांचे कसले काय दुख, तुझ्या दुखांचे बसतो ठाव मोजीत 

उच्छाद वस्तीत काल रात्री झाला, निश्चल एकुलता दिवा निमाला
कलेवरास त्याच्या देवून मूठमाती ,मजारीवर बसतो आयुष्य ढोसित

कलाबुतीचे कोणी करतो का सरपण ,सुक्या फांद्यांचे ते प्राक्तन
रोजचेच आहे भरजरी जगणे,राजमहाली राहतो राजा एक शोषित

विचार लाख प्रश्न आज सये त्वेषाने,ओठी अंगार बरसू दे
आता जळतेच आहे सरण माझे, तेवढेच बसतो तेल ओतीत

-'भावेश'

Friday, November 26, 2010

जबाबदारी

(हे आत्मगत २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात होतात्म्य लाभलेल्या साऱ्याना तसेच मृत्युमुखी पडलेल्या माझ्या बांधवांस मी अर्पण करतो,
हे वाचून नक्कीच एकदातरी आपण आपल्या जबादारीचा विचार कराल अशी खात्री बाळगतो )

                  
जबाबदारी
रक्तामासांत विखुरलेले माणुसपण,मी भग्न भंग ...
रक्ताळलेल्या काष्टांचे खच पाहत उभा,,
मांसाला चटावलेल्या  घारी
आकाशाला भेदुन येतात
अन चिमण्या पिलांवर घालतात झड़प
-
डोळ्यांच्या झडपा मी चटकन बंद करून घेतो
तरीही डोळ्यांपुढे अंधार लालेलाल
पहारे उभे राजमहालाशी
नौबती झडतात  रोजच्या रोज
नि उठतात पंगती प्रजेच्या जोरावर
आज त्यांचेच गळे कापलेले अन छाताडाला पडलेली भगदाड
आज साक्षात्कार साऱ्यांनाच आपण
सैतानाच्या गुहेत राहत असल्याचा
त्या सैतानाच्या वंशावळी ओरबाडताहेत 
तुम्हाला ,साऱ्यांना, मला
त्यांचे हात माझ्यापर्यंत पोहचतात...
नि मी खाडकन डोळे उघडतो,
-
समोर चार हात प्रेताला उचलून नेताहेत
पोलिसांच्या शिट्या वाजतात
अम्ब्युलंस समोरून  निघून जाते
तिचं ढणाणा आवाज कानात घुमत राहतो
मी शांत ,स्तब्ध, क्षणभर -
तेवढ्यात बातमी येते,
 '
करकरे साहेबाना गोळ्या लागल्यात ,साळसकर
          
कामते शहीद झालेत'
मी सर्द,
समोरून एक ग्रेनेड पायाशी येऊन पडतो
मला त्याचे काही वाटत नाही
मी मागे वळतो
मागे दाट अंधार, समुद्रावर त्याची छाया
दूर अंधारात ,वाळकेश्वरच्या 'टोंवर ऑफ पीस' वरला
एकाकी दिवा चमकतो ,
क्षणभर बाजूला पाहतो
'
करकरे, साळसकर,कामते आणि त्यांचे अठरा सहकारी
माझ्याबरोबर उभे आहेत ,
माझ्यासारखंच  अंधार नीरखत ,
उगवत्या सूर्याची वाट पाहत
'
दहशतवाद ' ,हा कसला 'वाद'?
'
वाद' हि विचारांशी बांधिलकी ,वादातीत!
असलं सगळं तत्वज्ञान एकवटतं डोक्यात एकदा,
फक्त एकदाच
दुसऱ्या क्षणी ,
जाणीव होते जबाबदारीची !
   
रक्ताचे डाग धुतले जातील
   
भडाग्नित  राख होईल हाडांची
   
पंचनामे झाल्यावर पुन्हा पूर्ववत होईल सारं
पुन्हा गर्दी होईल 'गेटवे' अन 'ताज' पाहायला
पुन्हा पायथ्याशी बोटी उभ्या राहतील,
पुन्हा नरीमन पोइन्ट वर गर्दी जमेल
पुन्हा 'लिओपोल्ड' मध्ये शिलोप्याच्या  गप्पा रंगतील कॉफीच्या घोटांसवे    
पुन्हा मुंबई धावू लागेल
-
दोन दिवस शोक मनवल्यावर सरकारही आपल्या जबाबदारीतून मोकळं होईल
राहिला प्रश्न माझा, आपला
कदाचित,
पुन्हा तेच हल्ले होतील
नेहमीसारखेच
सैतानाचे दूत मोकळे सुटतील
राजरोस रस्त्यावर
लुत लागलेल्या लावीप्रमाणे
 
आपलं काळीज शोधत
जबाबदारी  कोणाची?
असं विचारल्यावर तोंड फिरवणार सारे
मग करायचं काय आपलाच चेहरा आरश्यात पाहण्यावाचून
..........
--
हो तू तूच 
-
मी,? .....मीच!
हो माझीच जबाबदारी !
'
माझा मानववंश' वाचवण्याची

@
भावेश'काव्या'



Wednesday, November 10, 2010

पत्ता तुझा

तू सोडून जा मला अशीच दिगंतारात अधांतरी,
मी वाट पाहीन तुझी आंधळ्या तारखेपर्यंत'
धुंदावलेल्या पांढुरक्या रस्त्यांना कुम्पनांचे कुंपण,
आणि त्याच वाटेवरून ये तू पुन्हा मी जग पाहत नसल्यासारखा,
मला कोणी सांगितले नाहीत, त्यांचे पत्ते नेहमीचे,
फ़क़्त जाणाऱ्या पावलांचे ठसे, फ़क़्त निघून गेल्याच्या खुणा

मी धावत राहतो, त्या खुणांच्या पाठी , उद्या कदाचित तुझी भेट होईल ,
दूर कुठेतरी तुझी सावली, जाते क्षितिजाला चुकवून
नि मी धावत सुटतो, दुखांच्या पलीकडले शोधण्यासाठी,
देताना चार अश्रू उधार, माझा घसा कोरडा पडतो,
नि मग मी रिता उभा राहतो तसाच साहत झळा,
सलत राहतो मी, माझ्याच मनास
अन जिवंत असल्याचा आभास जाणवू लागतो

त्या खुणा माझ्याभोवती पिंगा घालू लागतात
पावलांचे ठसे माझ्या पायाला बसतात खेटून
आणि मी पुन्हा आठवू पाहतो,
पत्ता तुझा!

@भावेश 'काव्या'